जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा देवतेचे मूळ स्थान असलेल्या कडेपठार गडावरील अन्नपूर्णा अन्नछत्रांमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलच्या द्रोण-पत्रावळींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. श्री खंडोबा देवता लिंग कडेपठार ट्रस्टने हा निर्णय घेतला असून, भाविकांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक पानांच्या द्रोण-पत्रावळींचाच वापर करण्याचे आवाहन ट्रस्टने केले आहे.

कडेपठार मंदिर परिसरातील अन्नछत्रांमध्ये कडेपठार ट्रस्टसह अनेक भाविक वर्षभर अन्नदान करीत असतात. अन्नदानासाठी येताना अनेक भाविक प्लास्टिक आणि थर्माकोलच्या द्रोण-पत्रावळी घेऊन येतात. मात्र, त्यांचे सहज विघटन होत नसल्याने त्यांचा कचरा परिसरात साचत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढून पर्यावरणाची हानी होत आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टने अन्नछत्रांमध्ये केवळ नैसर्गिक पानांच्या पत्रावळींचाच वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक व थर्माकोलच्या द्रोण-पत्रावळी अथवा अन्य अशा वस्तू देवस्थानकडून स्वीकारल्या जाणार नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

निसर्गसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय लागू करण्यात आल्याची माहिती मुख्य विश्वस्त म्हाळसाकांत जेजुरीकर यांनी दिली.
दरम्यान, दीपक थोरात, दिलीप बांदल, डॉ. रामदास कुटे, अलका शिंदे, ॲड. धनंजय भोईटे, नितीन राऊत, राजेश शिंदे यांच्या उपस्थितीत झाडांच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळींमध्ये भोजनप्रसाद घेऊन या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.