जेजुरी : जेजुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवले. या पक्षाने २० पैकी १७ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई यांचे चिरंजीव जयदीप बारभाई हे भाजप उमेदवार सचिन सोनवणे यांच्यापेक्षा ३५१५ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. शिवसेना ( शिंदे ) पक्षाचे उमेदवार दिनेश सोनवणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

यापूर्वी ही नगरपालिका काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांच्या ताब्यात होती. नगराध्यक्ष वीणा सोनवणे यांनी पाच वर्षे नगराध्यक्षपद भूषविले. मात्र, पाच महिन्यांपूर्वी संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तालुक्यातील निवडणुका कमळाच्या चिन्हावर लढवण्याची घोषणा केली होती. त्यांच्याबरोबर जेजुरीतील सर्व नगरसेवक भाजपमध्ये गेले नाहीत.

भाजपला उमेदवार उभे करताना मोठी कसरत करावी लागली. बराचसा वेळ नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार निवडीत गेला. अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ उमेदवार मिळाले नाहीत. मात्र, तरीही भाजपने १० प्रभागांत २० उमेदवार उभे केले. अवघ्या दोन जागांवर भाजपला विजय मिळाला, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार तानाजी खोमणे यांनी विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

या निवडणुकीत पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी जेजुरी शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख दिनेश सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना ११६५ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

गेली तीस वर्षे दिलीप बारभाई यांची एकहाती सत्ता होती. नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई हे त्यांचे पुत्र आहेत. मागील निवडणुकीत वीणा सोनवणे यांनी जयदीप बारभाई यांच्या पत्नीचा पराभव केला होता. या निवडणुकीत वीणा सोनवणे नगरसेवक पदासाठी दोन ठिकाणांहून उभ्या होत्या. मात्र, त्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. त्यांचे दीर सचिन सोनवणे यांचाही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.