तीर्थक्षेत्र जेजुरी येथे कऱ्हा नदीवर स्नानासाठी उतरलेले भाविक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या तीन आठवडय़ांमध्ये अशा प्रकारे चौघांचा मृत्यू झाला. गेल्याच रविवारी (४ मे) शरद मोहन तांबे हा नवरदेव पाण्यात बुडाल्याची घटना घडली.
जेजुरीजवळ कऱ्हा नदीवर नाझरे धरण आहे. त्याच्या मल्हारसागर जलाशयात दररोज हजारो भाविक स्नान करतात. हे धरण जलसंपदा विभागाचे आहे. धरणाजवळ त्यांचे कार्यालयही आहे. मात्र, तिथे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते. परंतु, येथे भाविकांना स्नान करण्यासाठी दगडी घाट बांधलेला नाहीत. त्यामुळे भाविक थेट धरणात उतरतात. धरणाच्या िभतीसमोर अनेक जुन्या विहिरी, खड्डे आहेत. ते बाहेरून दिसत नाही. पात्रात चार-पाच फूट पाणी असल्याने भाविक पाण्यात पोहतात, पुढे जातात पात्रातील खड्डय़ांमध्ये बुडतात. गेल्या १० वर्षांत या धरणात ७० ते ८० भाविकांचे बुडून मृत्यू झाले आहेत.
अनेक नवविवाहित जोडपी जेजुरीला देवदर्शनासाठी येतात. यापूर्वी काही नवरदेवांचे मृत्यू झाले आहेत. जलसंपदा विभाग, जेजुरी नगरपालिका व खंडोबा देवस्थान यांनी एकत्र येऊन याबाबत उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत आहे. येथे सोमवती अमावस्येच्या यात्रेला जीवरक्षक पथक ठेवले जाते. पण त्याचाही पुरेसा उपयोग झालेला नाही. दगडी घाट बांधून भाविकांना स्नानाची व्यवस्था करावी अशी भाविकांची खूप दिवसांची मागणी आहे. कऱ्हा नदीवर स्नानासाठी योग्य जागा नेमून देणे, मार्गदर्शन करणारे फलक लावणे, जीवरक्षक नेमणे आदी सुविधा त्वरित होण्याची मागणीही होत आहे.