पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी घडली. अपघातात चार वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली), माधवी राजाराम सलगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली), राश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्या वारकरी महिलांची नावे आहेत. ‘अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तीन वारकरी महिला मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत’, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीतील ट्रक सासवड-जेजुरी रस्त्यावरुन सोमवारी (१३ जुुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास सासवड-जेजुरी रस्त्यावरुन निघाला होता. त्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा परिसरात होता. वारकरी आणि वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरुपात दुभाजक टाकण्यात आले होते. उजवी बाजू वाहनांसाठी ठेवण्यात आली होती. डावी बाजू पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आली होती. पालखी मार्गावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या वेळी सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज गावातील दिंडीत सहभागी झालेल्या सात वारकरी महिला वाहनांसाठी निश्चित केलेल्या मार्गिकेवर होत्या. बेलसर टोलनाक्याजवळ शिवदीप लाॅजजवळ ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वारकरी महिलांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाला. अपघातात चार वारकरी महिलांवर जेजुरीतील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय अधिकारी शिळीमकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

७० वर्षीय ट्रकचालक ताब्यात; ताप, सर्दीसाठी ओैषधे घेतल्याचे उघड

‘अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ७० वर्षीय ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. तेव्हा तो अत्यवस्थ होता. त्याने सर्दी, तापासाठी ओैषधे घेतली होती. दुसऱ्या वाहनाला ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात त्याने ट्रक अचानक डाव्या बाजूला वळविला. ट्रकच्या धडकेत सात वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या’, अशी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

पालखी सोहळ्यात शोककळा

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी महिलांना दिंडीतील ट्रकने धडक दिल्याने जेजुरी परिसरात शोककळा पसरली. जेजुरी परिसरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर भाविकांचीम मोठी गर्दी झाली. वारकरी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भाविकांनी हळहळ व्यक्त केली.

अपघात नेमका कसा घडला, तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या अन्य बाबींची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. चालकाची वर्तणूक, त्याची वैद्यकीय स्थितीबाबतची माहिती घेण्यात येत आहे. कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. – संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस दल

सुनेत्रा पवार यांची रुग्णालयात भेट

अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जखमी वारकरी महिलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. वारकरी महिला, तसेच त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. ‘राज्य शासन मृत, तसेच जखमी वारकरी महिलांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करुन दिली जाईल,’ असे त्यांनी सांगितले. पवार यांनी पालखी सोहळा प्रमुख, वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांकडून अपघाताबाबतची माहिती घेतली. ‘जखमींवर आवश्यक ते उपचार तातडीने करावेत. त्यांना आवश्यक ती मदत करावी’, अशा सूचना पवार यांनी प्रशासनाला दिल्या.