जेजुरीच्या वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी बसला. पवार यांच्या वाहनांचा ताफा २० ते २५ मिनिटे वाहतूक कोंडीत अडकला होता.
लग्न सराईमुळे जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा अनुभव घ्यावा लागला. हा ताफा रविवारी दुपारी बारामतीहून पुण्याकडे निघाला होता. पवार यांच्याच गाडय़ांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
हडपसर-जेजुरी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या रखडले आहे. जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. भाविकांना वाहनेही रस्त्यावरच उभी करावी लागत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या भागातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा अनुभव येतो. शरद पवार यांनीच जेजुरीच्या वाहतूक कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता तरी हडपसर-जेजुरी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.