जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथे श्री खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा येत्या सोमवारी (१५ जून) भरणार आहे. यंदा पालखी सोहळा रात्रभर असल्याने श्री मार्तंड देव संस्थानसह सर्व शासकीय यंत्रणांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, फिरती शौचालये, याबाबत नगरपालिकेकडून व्यवस्था करण्यात आली असून, यानिमित्ताने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यात्रेच्या तयारीसाठी होळकरांच्या ऐतिहासिक छत्री मंदिरामध्ये खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य इनामदार राजाभाऊ पेशवे, श्री मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, व्यवस्थापक आशिष बाठे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, जेजुरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिव छबन कुदळे, सुधीर गोडसे, शैलेश राऊत, दत्तप्रसाद खाडे, नगरसेवक कृष्णा कुदळे, अनिल झगडे आदी उपस्थित होते.
श्री खंडोबा देवाची पालखी कऱ्हा नदीवर जाण्यासाठी पहाटे दोन वाजता प्रस्थान ठेवणार असल्याचे पेशवे यांनी जाहीर केले. कऱ्हा नदीवर पालखीतील खंडोबा म्हाळसादेवीच्या उत्सव सोमवारी सकाळी सहा वाजता मूर्तींना स्नान घातले जाणार असून, सकाळी आठ वाजता पालखी परत खंडोबा गडावर येणार आहे. अमावस्या रविवारी दुपारी एक वाजून २० मिनिटांनी सुरू होणार असून, सोमवारी सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी संपणार आहे. दीड वर्षाने अधिकमासात सोमवती आल्याने भाविकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पालखी सोहळ्यातील कऱ्हा नदीपर्यंत रस्ता, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आदी व्यवस्था संस्थानाने केली असल्याचे मुख्य विश्वस्त ॲड. विश्वास पानसे यांनी सांगितले. मुख्य रस्ता आणि पायरी मार्गावरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत. गावामध्ये वीजपुरवठा, पाणीपुरवठा, फिरती शौचालये, याबाबत नगरपालिकेकडून तयारी करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी स्पष्ट केले.
‘गडावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. आवश्यक तेथे गर्दी रोखली जाईल,’ असे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.
गर्दीची शक्यता
धार्मिक कार्य करण्यासाठी अधिक मास हा पवित्र मास मानला जातो. दर वर्षी किमान दोन सोमवती यात्रा भरतात. मात्र, गेल्या दीड वर्षात सोमवारी अमावस्या न आल्याने एकही यात्रा भरली नव्हती. दीड वर्षाने आणि अधिक मासात ही सोमवती आल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे.
