scorecardresearch

जेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले

श्रीक्षेत्र जेजुरी येथील पारंपारिक झेंडू बाजारात व्यापाऱ्यांनी ७० ते ८० रुपये किलो भावाने झेंडूच्या फुलांची खरेदी केली.

जेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी ; फुलांचा तुटवडा असल्याने भाव वाढले
जेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजारात ८० रुपये किलोने झेंडूची खरेदी

श्रीक्षेत्र जेजुरी येथील पारंपारिक झेंडू बाजारात व्यापाऱ्यांनी ७० ते ८० रुपये किलो भावाने झेंडूच्या फुलांची खरेदी केली. ही फुले पुणे, पिंपरी -चिंचवड, मुंबई, ठाण्यासह राज्याच्या विविध भागात पाठवण्यात आली. झेंडूच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. आपट्याची पानेही (सोने) बाजारात मोठ्या प्रमाणात आली होती.

हेही वाचा >>> पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार एनसीसीचे प्रशिक्षण

सोमवारपासूनच झेंडू बाजार भरला, परंतु बाजारात शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी कमी आणल्याने व्यापाऱ्यांची निराशा झाली. अनेक व्यापारी खरेदी न करता माघारी गेले, मात्र मंगळवारी खंडेनवमी असल्याने सकाळपासूनच बाजारात पुरंदर तालुक्याबरोबरच इतर तालुक्यातील झेंडूची फुले विक्रीस आली. त्यामुळे बाजारात चांगली उलाढाल झाली. फुलांच्या प्रतवारीनुसार ७० ते ८० रुपये किलो भाव मिळाला. चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवले. पुरंदर तालुक्यामध्ये पूर्वी झेंडूतील गोंडा या जातीचे उत्पादन घेतले जायचे, पावसावर अवलंबून असलेला हा गोंडा माळरानावरही चांगला फुलायचा, परंतु ही फुले जास्त वेळ टिकत नसल्याने आता सर्व शेतकरी झेंडूमधील सुधारित जातीच्या रोपांची लागवड करून उत्पादन घेत आहेत. दसरा -दिवाळीला हक्काचे पैसे मिळतात म्हणून बहुतांश शेतकरी झेंडूची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ताजी फुले शेतातून तोडून विक्रीसाठी आणली त्यामुळे या फुलांना जास्त भाव मिळाला. पुरंदर तालुक्याच्या विविध भागात गेले महिनाभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने झेंडू पिकाचे नुकसान झाले आहे. नेहमीच्या तुलनेत यंदा निम्माच बाजार भरला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले .येथून खरेदी केलेला झेंडू शहरी भागात टेम्पो, ट्रकने पाठवला जातो व तेथे झेंडूची किरकोळ स्वरूपात १५० ते २०० रुपये किलोने विक्री केली जाते. यातून व्यापाऱ्यांनाही चांगला नफा मिळतो.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या