पुणे : पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी जेजुरीतील श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. खेडेकर यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
‘या प्रकरणात खेडेकर यांना मंगळवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पाेलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे,’ असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी सांगितले.
पुणे महापालिकेतील बनावट भरती प्रक्रिया गैरव्यवहार प्रकरणात खेडेकर यांच्यासह शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बनसोडे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या बाबत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी फिर्याद दिली होती. महापालिकेत विविध पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने बेरोजगार तरुणांकडून मोठ्या रक्कमा घेण्यात आल्या. त्यासाठी महापालिकेचे बनावट पत्र, शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करुन नियुक्तीपत्रे तयार करण्यात आली होती. उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. बनावट ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे, वेतन पत्रिका देण्यात आल्या होत्या. काही उमेदवारांच्या खात्यात वेतन जमा करण्यात आल्याचे भासविण्यात आले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात चौदापेंक्षा जास्त उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन जवळपास पावणेतीन कोटी रुपयांची रक्कम घेण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणात ४५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तपासात तक्रारदार तरुण समोर आल्यानंतर फसवणुकीची व्याप्ती वाढली.
