दाम्पत्याला गुंगीचे ओैषध देऊन नोकराने ४० तोळे सोन्याचे दागिने, रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना मुंढवा भागातील एका सोसायटीत घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नरेश शंकर सौदा (वय २२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचे आई-वडील निवृत्त झाले आहेत. आई-वडिलांची देखभाल; तसेच घरातील कामे करण्यासाठी त्यांना नोकराची गरज होती. ऑनलाइन नोकर उपलब्ध करुन देणाऱ्या एका खासगी कंपनीकडून त्यांनी मुंबईतून नरेशला पुण्यात कामासाठी बोलावून घेतले होते. गेल्या महिनाभरापासून तो ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरी काम करत होता. त्याला पगाराचे पैसे देण्यात आले होते.

हेही वाचा >>>पाणी गळतीचे खापर पुणेकरांवर; महापालिका प्रशासनाचा अजब कारभार

फिर्यादी महिलेच्या आई-वडिलांना सौदाने जेवणातून गुंगीचे ओैषध दिले. घरातील सोन्याचे दागिने, रोकड, हिरेजडीत दागिने असा २४ लाख रुपयांचा ऐवज लांबवून सौदा पसार झाला. ज्येष्ठ दाम्पत्याला दुसऱ्या दिवशी जाग आली. तेव्हा घरातून दागिने चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. सोसायटीतील एका रहिवाशाने या घटनेची माहिती मुंढवा पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपासात आरोपी सौदा मूळचा नेपाळचा आहे. सौदाची चारित्र्य पडताळणी न करता त्याला कामावर ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewellery worth rs 24 lakh stolen by servant by using chloroform to elderly couple pune rbk 25 zws
First published on: 07-12-2022 at 09:57 IST