scorecardresearch

तुम्ही बॅट पॅड घालून तयार… जितेंद्र आव्हाड यांची टीका

पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधून खासदारकी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या चढाओढीतूनच जगदीश मुळीक यांच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत.

Jitendra Awhad, BJP, Jagdish Mulik, Girish Bapat, Pune, MP
तुम्ही बॅट पॅड घालून तयार… जितेंद्र आव्हाड यांची टीका

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवणुकीबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही. मात्र खासदारकीचे तिकीट मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येत असून भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भावी खासदार म्हणून फलकबाजी सुरू झाली आहे. मात्र या फलकबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

हेही वाचा… पुणे : भावी खासदार म्हणून भाजप शहराध्यक्षांची फलकबाजी

गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या जागेसाठी शहरातील भाजप नेत्यांमध्ये मोठी स्पर्धा आहेत. त्यासाठी काही नावांची चर्चा आहे. त्यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ आदींचा त्यात समावेश आहे. २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी जवळपास एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार का या बाबत स्पष्टता नाही. मात्र पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधून खासदारकी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या चढाओढीतूनच जगदीश मुळीक यांच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

आव्हाड यांनी या संदर्भात टीका करणारे ट्विट केले आहे. दहा दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बॅनर, का तुम्ही वाटच बघत होतात… आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळेपणा. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत. तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार, अशा शब्दांत आव्हाड यांनी टीका केली.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 12:44 IST

संबंधित बातम्या