पुण्यातील लाल महाल हा सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे काही काळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे असंख्य पर्यटक आणि शिवप्रेमी लाल महालात जाऊ शकत नसताना दुसरीकडे याच लाल महालामध्ये एका चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर रील्सचं शूटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला आहे. यासंदर्भात शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून संभाजी ब्रिगेडनं संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात चार जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण तापू लागलेलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं घडलं काय

पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महालामध्ये एका तमाशाच्या गाण्यावर चित्रीकरण झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी मिळून हे चित्रीकरण केल्याची माहिती देखील समोर आली आहे. या गाण्याच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या आठवणींचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लाल महालामध्ये अशा गाण्यांचं चित्रीकरण होणं हा लाल महालाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे. यानंतर कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“हे असं पुन्हा होता कामा नये”

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर अकाऊंटवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे. यापुढे हे होता कामा नये. कोणी केले असेल तर वापरू नका”, असं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.