पुणे : पोलीस दलात गुणवत्तापूर्ण, तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) पोलीस उपअधीक्षक जितेंद्र आनंद कदम यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
पोलीस उपअधीक्षक कदम हे १९९८ मध्ये पोलीस दलात शिपाई म्हणून रूजू झाले. २००४ मध्ये त्यांची उपनिरीक्षकपदी निवड झाली. नागपूर, मुंबई शहर पोलीस दल, महामार्ग सुरक्षा विभागात ते नियुक्तीस होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत, तसेच वानवडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात नियुक्तीस असताना त्यांनी वाहन चोरट्यांची माहिती संकलित केली.
वाहन चोरी प्रकरणात अटक केलेले, शिक्षा सुनावलेल्या आरोपींची माहिती संकलित करून विश्लेषण केले. कदम यांनी तपास करून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला. त्यांनी २३८ वाहनांचा शोध घेतला. साखळी चोरट्यांना पकडण्याची कामगिरी त्यांनी केली. ‘आयसीजेएस’ आणि ‘सीसीटीएनएस’ प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी योगदान दिले.
त्यांच्या योगदानामुळे राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाला पारितोषिक मिळाले होते. जुलै २०२४ मध्ये भारतीय न्यायसंहिता लागू करण्यात आली. न्यायसंहितेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी ‘सीसीटीएनएस’ आणि ‘ई-समन्स’ प्रणालीचा प्रभावी वापर केला. सेवा कालावधीत कदम यांना २०५ बक्षीसे मिळाली. पोलीस महासंचालकांचे पदक त्यांना मिळाले होते.
