जैवविविधतेचा प्रसार ‘जिविधा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २० ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य केंद्रामध्ये होणार आहे. बायोस्फिअर्स, इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, पुणे महापालिका आणि पुणे फॉरेस्ट डिव्हिजन यांच्यातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन २० डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या वेळी ‘पुण्यातील टेकडय़ांवरील जैवविविधता’ आणि ‘ताम्हिणी अभयारण्य’ या दोन विषयांवरील पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच डॉ. सचिन पुणेकर यांचे ‘जैवविविधता – काल, आज आणि उद्या?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. महोत्सवाच्या कालावधीमध्ये दोन छायाचित्र प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. बायोस्फिअर्सतर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता’ या विषयावर छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील विजेती आणि इतर निवडक छायाचित्रांचे एक प्रदर्शन भरणार आहे. तसेच भारतातील नामवंत छायाचित्रकारांच्या ‘भारतातील जैवविविधता’ विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. ही दोन्ही प्रदर्शने सकाळी १० ते रात्री ८ खुली असणार आहेत.
२१ डिसेंबर रोजी तळजाई टेकडीवर सकाळी ७ ते ९ या वेळेत वृक्षपरिचय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ तारखेला सिंहगड परिसरामध्ये हाच उपक्रम राबविण्यात येणार आहे. दीपक सावंत, डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. सचिन पुणेकर यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. २१ आणि २२ तारखेला दुपारी ३ ते ५ या वेळेत जैवविविधतेवर आधारित विविध माहितीपट दाखविले जाणार आहेत. याशिवाय २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘पुणे जिल्ह्य़ाची नैसर्गिक प्रतीकात्मक मानचिन्हे काय असावीत?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ज्ञ, वन्यजीव छायाचित्रकार, विविध संस्थांचे प्रतिनिधी, निसर्गप्रेमी आणि मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या वेळी चर्चिल्या गेलेल्या मुद्दय़ांचा मसुदा तयार करून तो नंतर शासनाला सादर केला जाणार आहे. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी निसर्ग विषयक प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली आहे.