महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त मुख्य परीक्षा २०२२ पुढे ढकलण्यात आली आहे. संयुक्त मुख्य परीक्षाअंतर्गत परीक्षा डिसेंबर-जानेवारीमध्ये घेण्यात येणार होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- ‘बेकायदा बाइक टॅक्सी बंद करा’; पुण्यात हजारो रिक्षाचालकांचे ठिय्या आंदोलन
आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २४ डिसेंबर रोजी संयुक्त पेपर क्रमांक १, ३१ डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक, ७ जानेवारी २०२३ रोजी राज्य कर निरीक्षक, १४ जानेवारी २०२३ रोजी सहायक कक्ष अधिकारी या पदांची परीक्षा होणार होती. मात्र, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोगाने परिपत्रकाद्वारे सोमवारी दिली. आता संबंधित परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचेही आयोगाच्या सहसचिवांनी नमूद केले आहे.