पुणे : ‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा बिनदिक्कत उभी केली जाणारी वाहने, खाद्यपदार्थांची थाटलेली दुकाने आणि रस्त्यांवर होणारे अतिक्रमण यामुळे प्रवाशांचा विमानतळापर्यंतचा प्रवास अत्यंत जिकिरीचा होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानळावरून बाहेर पडताच शहराचे प्रतिबिंब यातून दिसून येत असल्याने हे चित्र तातडीने बदलायला हवे,’ अशी मागणी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक डॉ. सुधीर मेहता यांनी केली.
‘या रस्त्यांवर होणारी अतिक्रमणे काढून, बेकायदा उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. तसेच, सुंदर आणि स्वच्छ पुण्याची ओळख दाखवून द्यावी,’ असे पत्र पुणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे देऊन तक्रारही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. मेहता म्हणाले, ‘पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळाचा दिवसेंदिवस विस्तार होत असून, विमानांच्या उड्डाणांची संख्याही वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमुळे परदेशी नामांकित कंपन्या पुणे शहराशी जोडल्या जात आहेत. अशा परिस्थितीत दळणवळणाच्या साधनात आणखी लवचीकता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अतिक्रमणे, रस्त्यांच्या कडेला प्रतीक्षेत थांबलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. कोंडीतून मार्ग काढून विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. याचा फटका व्यापारी वर्गाला, परदेशी कंपन्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गैरप्रकारांना तातडीने चाप बसविण्यासाठी वेळीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.’
‘विमान उड्डाणांच्या संख्येतील वाढ फायद्याची’
‘केंद्र सरकारने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे वाढविली आहेत. दिवसातून २२० ऐवजी २३५ विमानांची ये-जा होणार आहे. याचा फायदा प्रवाशांबरोबर व्यावसायिकांना होईल. व्यापार, उद्योगानिमित्त बाहेर जाण्यासाठी आसनांचे आरक्षण नसल्याने मुंबई किंवा इतर विमानतळांवरून प्रवास करावा लागत होता,’ असे डॉ. सुधीर मेहता यांनी स्पष्ट केले.