पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदल प्रकरणात ससून रुग्णालयातील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह चौघांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी शुक्रवारी दिले. न्यायालयाच्या आदेशाने डाॅ. तावरे यांच्यासह तिघांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख डाॅ. अजय तावरे, आपत्कालीन वैद्यकीय विभागातील अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या सांगण्यावरून आरोपी राहुल गायकवाड, अश्फाक मकानदार यांनी ससूनमधील डाॅक्टरांना पैसे पुरविल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर दोघांना पोलिसांनी मुंबईतून अटक केली. डाॅ. तावरे, डाॅ. हाळनोर, घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. आरोपी गायकवाडसह मकानदारला न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गायकवाडला न्यायालयात हजर केले.

हेही वाचा – टोमॅटोचा भाव वधारला, किरकोळ बाजारात दर ८० रुपये किलोवर

हेही वाचा – ‘ससून’च्या उपाहारगृहातील कामगाराचा जामीन अर्ज फेटाळला, अमली पदार्थ तस्करी प्रकरण

डॉक्टरांना पैसे रुग्णालयात आणून देणारा आरोपी राहुल गायकवाड सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची पोलीस कोठडी मिळवण्याचे हक्क अबाधित ठेवण्यात यावेत. याप्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत असून, तपासात आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. ससूनमधील सीसीटीव्ही चित्रीकरण बारकाईने तपासायचे आहेत. त्यानंतर गायकवाड याची पोलीस कोठडी पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येईल, असे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले. गायकवाड याला रक्तदाबाचा त्रास आहे. त्याचे वजन जास्त आहे. त्याला वैद्यकीय उपचार मिळावेत, असे गायकवाड याच्या वकिलांनी युक्तिवादात सांगितले.