scorecardresearch

जुन्नर, आंबेगावनंतर आता शिरूर तालुक्यातही बिबट्याचा वाढता वावर; उसाच्या क्षेत्रात वास्तव्य, हल्ल्याच्या घटनांत वाढ

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर प्रामुख्याने दिसून येत होता.

जुन्नर, आंबेगावनंतर आता शिरूर तालुक्यातही बिबट्याचा वाढता वावर; उसाच्या क्षेत्रात वास्तव्य, हल्ल्याच्या घटनांत वाढ
(संग्रहित छायाचित्र)

शिरूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर प्रामुख्याने दिसून येत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत शिरूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. जनावरे आणि माणसांवरील हल्लेही वाढत असल्याचे दिसून येत असून, याच आठवड्यात हल्ल्याच्या तीन-चार घटना घडल्या आहेत. पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील चित्र सिंचनामुळे बदलले असून, उसाची शेतीही वाढली आहे. अशाच भागांत बिबट्या आढळून येत आहेत. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : पैठणमधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी, पैसे वाटल्याच्या आरोपालाही प्रत्युत्तर; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

शिरूर तालुक्यातील बेट भाग, जांबूत पिंपरखेड, वडनेर, टाकळी हाजी या भागांत काही वर्षापासून उसाचे क्षेत्र वाढले आहे. बिबट्याचा वावर जुन्नर, आंबेगाव या भागात पूर्वीपासून आहे. परंतु, मागील काही वर्षापासून शिरूर तालुक्यातील बेट परिसर, मांडवगण फराटा या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला आहे. दोनच दिवसांपूर्वी पिंपरखेड येथील अरुण डोमे यांच्या शेतात संजय नाना दुधावडे (वय ३०) हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. ६ सप्टेंबर रोजी वडनेर येथे हरिश्चंद्र बारकू वाघमारे (वय ६५) या ज्येष्ठ नागरिकावर बिबट्याने हल्ला केला. निमोणे येथील साकोरे वस्तीवरील पाच शेळ्या १० सप्टेंबरला रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाल्या. यापूर्वी ६ ऑक्टोबर २०१९ रोजी पिंपरखेड येथे अडीच वर्षाची मुलगी समृद्धी जोरी ही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली होती.

हेही वाचा <<< मराठा आरक्षणाबाबतच्या सुनावण्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच; राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निर्णय

बिबट्याच्या वावराबाबत शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले, की सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात पाऊस असल्यास बिबट्याचा वावर वाढत असतो. शिरूर तालुक्यात बिबटयाचा वावर असलेल्या बेट भागात उसाचे प्रमाण अधिक आहे. साहजिकच बिबट्याला लपण्यासाठी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. बिबट्याचे भक्ष्य ठरणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांचे प्रमाणही या परिसरात अधिक आहे. बिबट्याने हल्ल्या केल्याच्या घटना घडलेल्या पिंपरखेड, जांबूत, वडनेर या परिसरात आठ पिंजरे लावण्यात आले आहेत. बेट भागातील बिबट्याचा वावर वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर या भागातील कॅमरे लावून सर्वेक्षण करण्याचे काम वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केले आहे.

संरक्षणासाठी काय काळजी घ्यावी…

बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर उघड्यावर झोपू नये. रात्री शेतीवर पाणी भरण्यासाठी जात असताना एकट्याने जाऊ नये. सोबत कोणीतरी असावे. बरोबर बॅटरी, काठी असावी. मोबाइल असल्यास त्यावर गाणी लावावीत. आपल्या घराच्या कुंपणाला तसेच जनावरांच्या गोठ्याला जाळी लावावी. शक्य झाल्यास घराच्या परिसरात उसाची लागवड करू नये. पोल्ट्री फार्म असणाऱ्यांनी मृत कोंबड्यांसह अन्य कचरा हा पोल्ट्रीलगत न टाकता अन्यत्र पुरून टाकावा. पोल्ट्री लगतच मृत कोंबड्या किंवा अन्य कचरा टाकल्यास त्या ठिकाणी श्वानांचा वावर वाढतो आणि त्या पाठोपाठ बिबटे तेथे पोहोचतात, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Junnar ambegaon leopards increasing incidence attacks pune print news ysh

ताज्या बातम्या