जुन्नर : जुन्नरमधील बल्लाळवाडी परिसरात असलेल्या शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. सोहम जयसिंग नवले (वय १२) आणि विघ्नेश महेश पवार (वय ८) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बल्लाळवाडी येथे एका शेततळ्याचे कंपाउंड बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अपूर्ण असून, तळ्याभोवती सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सोहम हा तळ्यात पडला असता त्याला वाचवण्यासाठी विघ्नेश पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.
याबाबतची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. शोधकार्यानंतर सुमारे १५ मिनिटांत सोहमला बाहेर काढण्यात आले. विघ्नेशचा शोध सुमारे दोन तासांनंतर लागला. दोघांनाही तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गोरे यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण संपोंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपूर्ण काम आणि सुरक्षेचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
दरम्यान, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे. तळी, विहिरी, ओढे आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मुलांना एकटे जाऊ देऊ नये. संबंधितांनी अशा ठिकाणी सुरक्षाव्यवस्था करून इशारा फलक लावावेत, असे आवाहन सरपंच संजय नायकोडी, सामाजिक कार्यकर्ते सुधीर घोलप आणि ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण संपोंगे यांनी केले आहे.
