जुन्नर : विवाह जुळत नसल्याच्या रागातून एका तरुणाने वडील आणि भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील बागाडवाडी (पारगाव तर्फे मढ) येथे घडली. तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. जयराम महादू मुकणे ( वय ६५) आणि राजू जयराम मुकणे (वय ३०) असे खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाबाजी जयराम मुकणे (वय ३२) याला ओतूर पोलसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाजी याचा विवाह जुळत नव्हता. कुटुंबाकडून विवाह लावून दिला जात नसल्याचा आरोप तो करत असे. त्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यावरून बाबाजी याने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये वडील आणि भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकारानंतर आरोपीचा दुसरा भाऊ युवराज (वय २७) याने ओतूर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बाबाजी याला अटक केली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे पुढील तपास करत आहेत.