Junnar Accident / जुन्नर : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे गावाजवळ एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चौघेही एकाच गावातील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

खंडू नारायण भले (वय २५) आणि शिवराम नारायण पारधी (वय २६ रा. भलेवाडी, डिंगोरे, जुन्नर), दीपक सखाराम भले (वय २८) आणि आशिष ढवळू भले (वय २४, रा. मराडवाडी, डिंगोरे, जुन्नर) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. विठ्ठल यशवंत भले (वय ५२, रा. आंबेदरा, डिंगोरे, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. बसचालक नागेश बबन गुरव (वय ३५, रा. रा. गोरेगाव, अकोला) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजता एस.टी. बस अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरेतील जीवनदीप हॉटेलजवळ आली असता, बसची मोटरसायकलला जोरात धडक बसली. त्यामध्ये चौघे जखमी झाले. या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी आले. जखमींना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर चौघांना मृत घोषित केले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, उपनिरीक्षक युवराज जाधव आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.