जुन्नर : कांदा काढणीसाठी आलेल्या ३० ते ३५ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. जेवणाच्या भांड्यात पाल पडल्याचे निदर्शनास आले. मजुरांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मंगरूळ येथे कांदा काढणी सुरू आहे. कांदा काढण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मजूर या भागात आले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सर्व मजूर जेवण करत असताना, एका मजुराला अन्नाच्या भांड्यात मेलेली पाल दिसून आली. पाल दिसल्यामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. जेवण झाल्यानंतर काही वेळातच अनेकांना मळमळणे, चक्कर येणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला.

घटनेची माहिती मिळताच सर्व बाधितांना तातडीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. यामध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने मजुरांवर तत्काळ उपचार सुरू केले.

मंगरूळ येथून ३० ते ३५ रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून आरोग्य केंद्रात आणण्यात आले. अन्नात पाल पडल्याचे मजुरांनी सांगितल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारी म्हणून आवश्यक वाटल्यास काही रुग्णांना नारायणगाव किंवा मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले जाईल.

  • शिवाजी फड
    वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बेल्हे