जुन्नर : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या प्रचलित म्हणीला फाटा देत, जुन्नरमध्ये प्रशासकीय इच्छाशक्तीचा एक उत्तम आदर्श पाहायला मिळाला आहे. तब्बल १२ वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकलेला आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रलंबित असलेला कळवाडी येथील रस्त्याचा प्रश्न अवघ्या एका दिवसात निकाली काढण्यात आला आहे. जुन्नरचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांच्या या तत्पर कारवाईने सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये प्रशासनावरचा विश्वास पुन्हा दुणावला आहे.
कळवाडी येथील शेतकरी काशिनाथ काकडे (वय ६५) हे गेली १२ वर्षे आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत होते. सर्व कागदोपत्री पूर्तता करूनही रस्ता मिळत नसल्याने हतबल झालेल्या काकडे यांनी अखेर न्याय मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. या वयात त्यांनी पुकारलेला लढा पाहून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ आणि युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
ही बाब जुन्नरचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता या प्रकरणात स्वतः लक्ष घातले. सुरुवातीला त्यांनी सात दिवसांत हा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता त्यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली आणि आपल्या अधिकारांचा वापर करत अवघ्या एकाच दिवसात तो रस्ता शेतमाल वाहतुकीसाठी कायमचा मोकळा करून दिला. एखाद्या अधिकाऱ्याने मनावर घेतल्यास न्याय कसा मिळू शकतो, हे शिरसाठ यांनी कृतीतून दाखवून दिले.
वर्षानुवर्षे चिघळलेला हा वाद सोडवून शेतकऱ्याला न्याय दिल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार शिरसाठ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वतः न्याय मिळालेले शेतकरी काशिनाथ काकडे आणि शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष व जुन्नर तालुका शिवपाणंद रस्ता समितीचे समन्वयक सचिन थोरवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अधिकाऱ्याच्या या तत्परतेचा गौरव करण्यात आला. या वेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्कारप्रसंगी बोलताना सचिन थोरवे यांनी तालुक्यातील इतर रखडलेल्या ‘शिवपाणंद’ रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर तहसीलदार शिरसाठ यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, तालुक्यातील सर्व प्रलंबित रस्त्यांचे प्रश्न लवकरात लवकर आणि प्राधान्याने मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.
