नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील बदगी-बेलापूर रस्त्यालगत जखमी अवस्थेत आढळून आलेल्या दीड वर्षीय बिबट मादी ओतूर येथील वन विभागाने ताब्यात घेतले. उपचारासाठी तिला माणिकडोह येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. खामुंडी येथील सुभाष भिमाजी बोडके यांच्या शेतात बिबट मादी जखमी अवस्थेत आढळून आली.

याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक व्ही. ए. बेले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या बाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांना कळविली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल-वनरक्षक, आळे व नगदवाडी येथील रेस्क्यू टीम; तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथील डॉ. श्रीराम, प्रोजेक्ट अधिकारी महेंद्र ढोरे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तिला पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले.

सहायक वनसंरक्षक राजहंस तसेच जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.

माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथील डॉ. श्रीराम यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मादी बिबट्याचे वय अंदाजे दीड वर्षे असून, गेल्या तीन ते चार दिवसांपासून भक्ष न मिळाल्यामुळे ती अशक्त होऊन कोसळली असावी.’