जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षांच्या मुलीचा लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २५ वर्षीय आरोपीला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचा शोध घेत असल्याचे भासवत तो पोलिसांबरोबर फिरत होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला.

मुलगी चौथीत शिकत होती. ती आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. दुपारच्या सुमारास घरात पालक नसल्याची संधी साधून संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर मुलगी घरात दिसून न आल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही मुलगी आढळून न आल्याने आळेफाटा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

मुलीचा शोध सुरू असताना संशयित आरोपीही पोलीस आणि ग्रामस्थांसोबत शोधकार्यात सहभागी झाला होता. मात्र, त्याच्या वर्तनाबाबत पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने दाखविलेल्या ‘लेंडे स्थळ’ परिसरातील एका ओढ्याजवळ झाडाशेजारी मुलीचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील तसेच पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि गुन्ह्याशी संबंधित अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत.

या घटनेने जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलिसांकडून सुरू आहे.

खटला जलदगती न्यायालयात चालवणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत,अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

​ उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, ‘हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.

​पीडित कुटुंबाची लवकरच भेट घेणार

पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या,’ लवकरच पिंपळवंडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे.

पिंपळवंडी येथे घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी व मानवतेला काळिमा फासणारी आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेने मुलांच्या बाबतीत सतर्क राहावे. – आमदार शरद सोनवणे, जुन्नर