जुन्नर: जुन्नर नगरपरिषदेचा १५० कोटी १३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. जुन्नरकरांना करवाढ न करणारा हा अर्थसंकल्प असून, उत्पन्न वाढीसाठी जुन्नर शहरामध्ये ठिकठिकाणी वाहनतळ उभारून भाडेतत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत.
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सभेला नगराध्यक्ष सुजाता काजळे, उपनगराध्यक्षा रूपाली परदेशी, गटनेत्या वैष्णवी पांडे, गटनेता विक्रम परदेशी, नगरसेवक नरेंद्र तांबोळी, अनिल रोकडे, प्रशांत सराईकर, मयूर महाबरे, मंदार बुट्टे पाटील, समीर पुरवंत, अकीफ इनामदार, वाजीद इनामदार, सय्यद मोहम्मद साकी मोहम्मद, अलका फुलपगार, अंजली शिंदे, अनुजा पातुरकर, सुवर्णा जाधव, राजश्री खोंड, मुमताज बानो पटेल, सना मन्सुरी, राहीन कागदी आदी उपस्थित होते.
‘सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. करवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असे नगराध्यक्षा सुजाता काजळे यांनी सांगितले.
सभेमध्ये करवाढ करू नये, अशी भूमिका जुन्नर विकास आघाडीच्या सदस्यांनी घेतली. त्यानुसार करवाढ न करण्याचे ठरविण्यात आले. नगरपालिकेचा वापराविना असलेला एस. एम. जोशी हॉल, वरली आळी सभागृह वापरात आणून भाडे करार करून उत्पन्न वाढविण्याचे निश्चित करण्यात आले.
खासगी वास्तुविशारदांसाठी ५० लाख रुपये खर्च न करता नगर परिषदेतील अभियंत्यांकडून काम करून घ्यावे. केवळ मोठ्या प्रकल्पांसाठी वास्तुविशारदांची नेमणूक करावी, दैनंदिन कामे बांधकाम विभागाकडून करून घ्यावी, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या. गॅस शवदाहिनी पूर्ववत सुरू करून नि:शुल्क नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली.
अर्थसंकल्पातील प्रमुख योजना
- जिजामाता उद्यानालगत नगरपालिका मालकीच्या जागेत चौपाटी विकसित करणार
- नगरपालिकेची शाळा ‘स्मार्ट स्कूल’ करण्याची योजना
- जुन्नर शहरातील विद्युत जाळे भूमिगत करण्यासाठी तरतूद
- मोकळ्या जागांमध्ये व्यायामशाळा
- पद्मावती तलाव मासेमारीसाठी भाडेतत्त्वावर दिला जाणार
- भटकी जनावरे आणि श्वान यासाठी भरारी पथक, डॉग व्हॅनसाठी ३० लाख रुपयांची तरतूद
