जुन्नर : जुन्नर-ओतूर मार्गावर पांगरीमाथा येथे हायवा ट्रक आणि मोटार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जुन्नर येथील नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा मृत्यू झाला. अपघातात अन्य दोनजण जखमी झाले. ही दुर्घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक जुन्नर येथून ओतूरकडे चालला होता, तर मोटार विरुद्ध दिशेने येत होती. पांगरीमाथा येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अनंता बनाजी गवारी (वय ५२), विजय खारतोडे (वय ४८) आणि तुषार भीमराव कोरडे (वय ३५, सर्व रा. जुन्नर) जखमी झाले.
स्थानिक नागरिकांनी जखमींना वाहनांतून बाहेर काढले. त्यांना ओतूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. पुढील उपचारांसाठी गवारी आणि खारतोडे यांना पुण्याकडे नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना गवारी यांचे निधन झाले.घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस हवालदार नामदेव बांबळे, किशोर बर्डे, ट्रॅफिक वॉर्डन शुभम काशीद, अमोल मडके यांनी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.
