जुन्नर : जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती या पदांच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही शिवसेनेमध्ये युती झाली. त्यामुळे सभापतीपदी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कमल शेळकंदे, तर उपसभापतीपदी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अमित ढोले यांची निवड झाली. शिवसेना (शिंदे) पक्षाने महायुतीतील भाजपची साथ न घेता शिवसेना (ठाकरे) पक्षाला बरोबर घेतल्याने भाजप सत्तेपासून दूर राहिली आहे.
या पंचायत समितीत शिवसेना (शिंदे) पक्षाचे आठ सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सहा सदस्य विजयी झाले. भाजप आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. शिवसेना (शिंदे) पक्षाला सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना (ठाकरे) किंवा भाजप यापैकी एका पक्षाचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, शिवसेना (शिंदे) पक्षाने महायुतीतील भाजपचा पाठिंबा न घेता शिवसेना (ठाकरे) पक्षाला उपसभापतीपद देऊन सत्ता काबीज केली.
यावेळी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना तालुकाप्रमुख योगेश पाटे, नेताजी डोके, सचिन वाळुंज, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. निकालानंतर झालेल्या विजयी सभेमध्ये आमदार शरद सोनवणे म्हणाले, ‘जुन्नर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पंचायत समिती उपसभापती पदाबाबत वरिष्ठांशी चर्चा करूनच अमित ढोले यांना हे पद देण्यात आले आहे.’ ‘पाठिंबा देण्यात आला असला, तरी शिवसेना (ठाकरे) पक्षातच राहणार आहे.’ उपसभापती ढोले म्हणाले.
