जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. पिंपळगाव जोगा धरणापासून दीड किलोमीटरच्या अंतरावर मंगळवारी (१२ मे) पहाटे साडेचारच्या सुमारास कालवा फुटल्याने आसपासच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक शेतांतील पिके वाहून गेली.
या घटनेची माहिती मिळताच शेतकरी संतोष निमसे यांनी तातडीने धरणावर धाव घेत कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न केले. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर कालव्याचे पाणी बंद करण्यात यश आले. या घटनेत संतोष बबन निमसे, सुनील निमसे, शेखर हाडे, शंकर हांडे यांच्या पिकाचे नुकसान झाले.
तसेच या परिसरातील सुमारे ३० एकर क्षेत्रात पाणी साचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.दरम्यान, या घटनेची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
