जुन्नर : निसर्गसंपन्न जुन्नरच्या पश्चिम घाटातील ‘सडे पठारे’ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील गवताळ कुरणसंवर्धन व विकास योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम करणारी सडे पठारे आता पर्यटन विकासाचे मॉडेल ठरणार आहेत. या पठारांच्या शाश्वत विकासासाठी त्यांचा ‘युनेस्को ग्लोबल जिओपार्क’मध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी क्षेत्रीय भेटीदरम्यान ही माहिती दिली. वन विभागाच्या सडे पठारेसंवर्धन समितीचे सदस्य, राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे सदस्य गणेश कोरे, वन हक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे यांच्यासह सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी नुकतीच हिवरे पठार येथील सडे पठारांची पाहणी केली.
जुन्नर तालुक्यातील सडे पठारे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहेत. त्यांचे जागतिक आणि अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता, या पठारांच्या शाश्वत विकासासाठी त्यांचा ‘युनेस्को ग्लोबल जिओपार्क’मध्ये समावेश करण्यासाठी आराखडा तयार करण्याबाबतचे पत्र आमदार शरद सोनवणे यांनी वन विभागासह जिल्हा प्रशासनाला दिले होते. या पार्श्वभूमीवरच या क्षेत्रीय पाहणीचे आयोजन करण्यात आले होते.

तांबे, सुकाळवेढे, दुर्ग ढाकोबा आणि हिवरे पठार या भागात ही वैशिष्ट्यपूर्ण गवताळ पठारे पसरलेली आहेत. यातील काही भाग वन विभागाच्या, तर काही भाग शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. या सर्वांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यापूर्वी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. त्यात तज्ज्ञांकडून गवताळ कुरणांबाबत प्रबोधन केले जाईल. तसेच, क्षेत्रमालकांना पशुधनासाठी चाऱ्याची लागवड आणि त्यातून अर्थार्जन कसे करता येईल, याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. खासगी क्षेत्रातील पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचेही खाडे यांनी स्पष्ट केले.

तालुक्याला संवर्धनातून समृद्धीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. पर्यटनवाढीमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गवताळ पठारे जलसंधारणाचे काम करतात. या प्रदेशाच्या संवर्धनातून आदिवासी भागातील पशुधनासाठी दर्जेदार गवत उपलब्ध होईल. त्यातून दूधवाढीसाठी ‘मिशन गोकुळ’ अभियान वन आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येईल. सडे पठारे संवर्धन आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे.

  • शरद सोनवणे,, आमदार, जुन्नर तालुका

सुकाळवेढे – हिवरे पठार पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असून, येथील जैवविविधतेच्या संवर्धनातून निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या संवर्धनातून पशुधनाला चारा मिळेल आणि आदिवासी भागात दूध व्यवसायाला चालना मिळेल.

दत्ता गवारी, अध्यक्ष, वरसूबाई देवस्थान ट्रस्ट, सुकाळवेढे – हिवरे तर्फे मिन्हेर


पश्चिम घाटातील सडे पठारांच्या संवर्धनासाठी जुन्नर वन विभागाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. युनेस्कोच्या ‘ग्लोबल जिओपार्क’साठी आराखडा करण्याचे प्रयत्न आहेत. आमदार शरद सोनवणे यांनी सुरू केलेला पाठपुरावा येथील शेतकरी आणि पशुधनाच्या विकासासोबतच पर्यटनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

  • प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर वन विभाग