पुणे : जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर आणि शिरूर परिसरातील बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करण्याबरोबरच दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी दोनशे पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ‘अर्लट’ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रवक्ते वसंतराव जाधव, जिल्हा परिषद माजी सदस्या आशा बुचके, जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे प्रत्यक्ष तर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हापोलीस प्रमुख संदीपसिंग गिल हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

नाईक म्हणाले, ‘जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरूर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत, यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र सरकारच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील. वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे अशा उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने दोनशे पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी एक हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी दहा कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वनविभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश नाईक यांनी या वेळी दिले. नागरिकांच्या जिवीताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

गेल्या काही दिवसांत या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आहे. कालच्या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद केले आहे. या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधींबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी माहिती नाईक यांनी या वेळी दिली.