जुन्नर : जुन्नर तालुक्यातील तळेरान येथील वसईवाडीमध्ये जुळ्या भावंडांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे (वय ११, रा. तळेरान-वसईवाडी, ता. जुन्नर) असे मृत्युमुखी पडलेल्या जुळ्या भावंडांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे घोडेगाव येथील इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेत होते. उन्हाळी सुट्टी असल्याने मंगळवारी दोघे मोठ्या बहिणीबरोबर गावाजवळील तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते. बहीण कपडे धुवत असताना खेळता- खेळता दोघे पाण्यात उतरले. ते खोल पाण्यात गेल्याने बुडाले. बहिणीने आरडाओरडा केली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ तळ्याकडे धाव घेत शोधकार्य सुरू केले. सुमारे अर्ध्या तासानंतर श्रावणीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले त्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी गणेशलाही बाहेर काढण्यात आले. दोघांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे आहेत.

जुन्नरमधील दुसरी घटना

जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे २८ एप्रिल रोजी दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोहम जयसिंग नवले (वय १२) विघ्नेश महेश पवार (वय ८) अशी दोघांची नावे आहेत. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.