जुन्नर : जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात सुरू असलेल्या पावसाचा फटका आता ग्रामीण भागातील जुन्या घरांनाही बसू लागला आहे. मढ येथे सोमवारी सकाळी सुमारे सातच्या सुमारास घराची भिंत कोसळून वृद्धा जखमी झाली. वेळीच मदतीमुळे जीवितहानी टळली.
मंदाबाई शांताराम सदाकाळ (वय ७५) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सदाकाळ या आंघोळ करून स्वयंपाकघराकडे जात असताना अचानक भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. विटा आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली त्या अडकल्या. त्यांचा मुलगा संतोष यांनी विटा आणि माती बाजूला करून त्यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. स्थानिकांनी तहसीलदार रणजित भोसले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मंडल अधिकारी आणि तलाठी यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचा आदेश दिला.
घरांच्या भिंतींना तडे गेले असल्यास संबंधित कुटुंबांनी विलंब न करता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार भोसले यांनी केले.
२८ वर्षांनंतरही जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रतीक्षा
दरम्यान, सदाकाळ कुटुंबामध्ये संतोष सदाकाळ हे ओतूर येथील एका प्रयोगशाळेत काम करतात. पिंपळगाव जोगा धरण प्रकल्पासाठी या कुटुंबाची १२ एकर जमीन संपादित करण्यात आली. सुमारे २८ वर्षांनंतरही त्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याची व्यथा या कुटुंबाने मांडली.
