पुणे : ‘जिल्हा न्यायालये ही नागरिकांची न्यायालये आहेत आणि त्यामुळे जिल्हा न्यायालयांत वकिली करणारे वकील हे न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत,’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. ‘कठोर परिश्रम ही वकिली व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली आहे. तरुण वकिलांनी कायद्यांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि आपली व्यावसायिक कौशल्ये सातत्याने विकसित करावीत,’ असे आवाहन त्यांनी केले.
आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित सातत्यपूर्ण विधी शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन न्या. अभय ओक यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ एस. व्ही. कानेटकर, संस्थेच्या मानद सचिव वैजयंती जोशी, प्रभारी प्राचार्या डाॅ. दीपा पातुरकर या वेळी उपस्थित होत्या.
न्यायदान व्यवस्थेतील जिल्हा आणि तालुका न्यायालयांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना ओक म्हणाले, ‘नागरिकांचा न्यायव्यवस्थेशी सर्वाधिक थेट संबंध या न्यायालयांमध्ये येतो. तसेच खटल्याच्या प्रारंभिक टप्प्यावर झालेल्या चुका संपूर्ण प्रकरणावर गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे नागरिककेंद्री न्यायव्यवस्थेचा पाया असलेल्या जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांतील वकिलीचे महत्त्व नवोदित वकिलांनी समजून घेणे आवश्यक आहे. वकिलीचे कौशल्य केवळ पुस्तके वाचून नव्हे, तर न्यायालयात अनुभवी वकिलांचे युक्तिवाद आणि न्यायाधीशांचे कामकाज बारकाईने पाहूनही आत्मसात करावे. वकिलांनी जिज्ञासू वृत्ती ठेवावी, सतत प्रश्न विचारावेत आणि न्यायालयातील विविध प्रक्रिया कोणत्या नियम, विनियम आणि कायदेशीर तरतुदींनुसार पार पाडल्या जातात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वकिलांनी सर्व प्रकारच्या कायद्यांवर प्रभुत्व मिळवले पाहिजे. प्रभावी वकिलीसाठी केवळ मूलभूत कायद्यांचे ज्ञान पुरेसे नसून न्यायालयीन प्रक्रिया आणि कार्यपद्धतींचे सखोल ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे.’
‘वकिलांनी न्यायालयाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. तसेच न्यायाधीश आणि न्यायसंस्थेचा आदर केला पाहिजे. न्यायालयात अनावश्यक आक्रमकता टाळून आपले म्हणणे ठामपणे, प्रभावीपणे आणि सन्मानपूर्वक मांडण्याचे कौशल्य वकिलांनी विकसित करावे,’ असा सल्ला ओक यांनी दिला. त्याचबरोबर आपल्या पक्षकारांशी निष्पक्ष आणि प्रामाणिक राहणे हीदेखील वकिलांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
काय आहे सातत्यपूर्ण विधी शिक्षण कार्यक्रम?
इंडियन लॉ सोसायटीने अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रातील नवोदित वकिलांची व्यावसायिक क्षमता आणि वकिली कौशल्ये विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण कायदे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून १५० वकिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रत्येक गटात ३० प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. प्रकल्प संचालक डॉ. दीपा पातुरकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबवला जात असून, कार्यक्रम प्रमुख डॉ. वर्षा खंडागळे, कार्यक्रम व्यवस्थापक ऋचा ढमढेरे आणि सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक रोहन रांजणे यांच्या मदतीने राबवला जात आहे.
