पुणे : ‘मतदार विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या (एसआयआर) प्रक्रियेत निवडणूक आयोगाने तयार केलेला गणना अर्ज (एन्युमरेशन फाॅर्म) लोकप्रतिनिधित्व कायदा किंवा त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांमध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे हा अर्ज न भरल्याच्या कारणावरून पात्र मतदाराचे नाव मतदारयादीतून वगळणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे,’ अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी रविवारी मांडली.

‘एखादी व्यक्ती काही वर्षे मतदान करत असेल आणि त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत किंवा मतदार म्हणूनच्या पात्रतेबाबत काही आक्षेप असतील तर केवळ अर्ज न भरल्याने त्या व्यक्तीचे नाव वगळता येणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘एसआयआर’, निवडणूक आयोगाच्या मर्यादा, मतदारांना नोटीस देण्याची कायदेशीर प्रक्रिया आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमधील स्वायत्ततेचा मुद्यांबरोबरच माहिती अधिकार कायदा, पर्यावरण संरक्षण आणि विकासाच्या संकल्पनेचा परस्पर संबंधांबाबतही ओक यांनी सडतोड भूमिका मांडली.

‘एसआयआर’ वरून होत असलेल्या पक्षीय राजकारणाबाबतही त्यांनी खंत व्यक्त करताना ‘लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० किंवा त्याअंतर्गत १९६० मध्ये करण्यात आलेल्या मतदार नोंदणी नियमांमध्ये मतदार नोंदणी नियमांमध्ये या विशिष्ट अर्जाचा उल्लेख नाही. निवडणूक आयोगाने स्वत: तयार केलेल्या या अर्जाला कायदेशीर आधार काय,’ अशी विचारणाही ओक यांनी केली.

ते म्हणाले, ‘एसआयआर ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक बाब नाही. तिचा संबंध नागरिकांच्या मूलभूत लोकशाही अधिकाराशी आहे. एसआयआर प्रक्रियेला विरोध म्हणजे सत्ताधारी पक्षाला विरोध, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. तर तो निवडणूक आयोगाने कायद्याच्या चौकटीत काम करण्यासाठीचा आहे. मतदाराचे नाव मतदारयादीतून वगळण्यासाठी प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. संबंधित मतदाराबाबत भारतीय नागरिक असल्याची शंका असेल, ती त्या मतदारसंघात राहत नसेल किंवा मतदार म्हणून अपात्र ठरत असेल तर, त्या व्यक्तीला ‘कारणे दाखवा’ नोटीस द्यावी लागते. मात्र, एसआयआर प्रक्रिया गणना अर्ज न भरल्यास मतदाराचे नाव प्रारूप मतदार यातीतून वगळले जाणे ही प्रक्रिया कायदेशीर तरतुदींशी विसंगत आहे. प्रारूप मतदारयादीतून नाव वगळल्यानंतर त्यात नव्याने नाव नोंदविण्यासाठी नमुना क्रमांक सहा हा अर्ज भरण्यास सांगितले जाते. मात्र, हा अर्ज प्रामुख्याने नव्याने मतदार नोंदणी करणाऱ्या मतदारांसाठी आहे.’

निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबाबतही ओक यांनी भाष्य केले. ‘सर्वोच्च न्यायालयाने कायदा होईपर्यंत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीमार्फत निवडणूक आयुक्तांनी नियुक्ती करण्याचे सुचविले होते. मात्र, २०२३ मध्ये करण्यात आलेल्या कायद्यानुसार या समितीत सरन्यायाधीशांच्या जागी पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यात आला. या नियुक्तीला सर्वोच्य न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, हा प्रश्न नसून, त्यांची नियुक्ती कोणत्या पद्धतीने झाली आहे हा मूळ प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे काम करण्यासाठी नियुक्ती यंत्रणा स्वतंत्र असणे आवश्यक आहे,’ असेही ओक यांनी स्पष्ट केले.

‘आयोगाचे अधिकार कमी करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न’

‘निवडणूक आयोगाचे अधिकार कमी करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही. वेगवेगळ्या काळात सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक आोयगाचे अधिकार मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रश्नाकडे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आवश्यकता आहे,‘’ असे मतही अभय ओक यांनी मांडले.

‘नागरिकांच्या लढ्याला पक्षीय रंग नको’

‘‘एसआयआर’, पर्यावरणाचे प्रश्न, ध्वनीप्रदूषण किंवा नदी संवर्धन यासारख्या विषयांवर नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर त्याला सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील आंदोलनाचे स्वरूप दिले जाते,’ अशी खंत ओक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘विरोधी पक्षही अशा लढ्यांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नागरिकांचा लढा हा सत्ताधारी पक्षाविरोधात नसून, व्यवस्थेने कायद्याने पालन करण्यासाठी असतो. या प्रकारच्या प्रश्नांना पक्षीय रंग देण्याऐवजी त्यातील कायदेशीर मुद्दे समजून घेण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीत निवडणूक हा महत्त्वाचा टप्पा असला, तरी निवडणुकीपुरती नागरिकांची जबाबदारी नाही. शासन व्यवस्था कशी काम करते, सार्वजनिक प्रकल्पांवर किती खर्च होतो, प्रकल्पाचा कंत्राटदार कोण आहे, प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची मुदत किती आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. माहिती अधिकार हा केवळ अर्ज करण्यापुरता नसून, सामान्य माणसाचे जीवन समृद्ध करणारा अधिकार आहे.’

‘कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आयोजनांच्या वेळी नदी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाकडे लक्ष देण्याची आवश्यकताही अभय ओक यांनी व्यक्त केली. धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली नद्यांचे प्रदूषण करणे अयोग्य आहे. श्रद्धेच्या नावाखाली निसर्गाचे नुकसान करण्याचा अधिकार कोणाला नाही. नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबादरी केवळ सरकारी यंत्रणेची नाही, तर आयोजक आणि सहभागी नागरिकांचीही आहे,’ असेही ओक म्हणाले.

केवळ रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल किंवा मोठे प्रकल्प म्हणजे विकास नाही. नागरिकांना परवडणारी घरे, दर्जेदार वैद्यकीय सुविधा, परवडणारे शिक्षण, रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देणे हा विकासाचा भाग आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे नुकासन होत असल तर, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहरांच्या विकासाचे मूल्यमापन करतना पर्यावरण आणि नागरिकांच्या जीवनमानाचा विचार आवश्यक आहे. – अभय ओक, माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय