उत्तम दर्जाच्या वस्तू भरपूर संख्येने आणि वाजवी दरात उपलब्ध होऊन स्पर्धा निकोप राहावी म्हणून कॉम्पिटिशन कायदा खूप महत्त्वाचा ठरेल. ग्राहकांचे हित जोपासणे हाच या कायद्याचा उद्देश आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांनी शनिवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजच्या वतीने ‘कॉम्पिटिशन पॉलिसी अ‍ॅन्ड लॉ’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी न्या. वर्मा  बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा, प्रा. डॉ. के. डी. गौर उपस्थित होते. न्या. वर्मा म्हणाले की, सध्याचे जग हे स्पर्धात्मक आहे. स्पर्धेशिवाय गुणवत्ता वाढू शकत नाही. या स्पर्धेच्या काळात सर्व गोष्टी इंटरनेट, ई-कॉमर्स, ई-वेस्ट वर येऊन थांबल्या आहेत. ऑनलाईन शॉपिंग किंवा ट्रेडिंग ही एक गरज बनत चालली आहे. पुढच्या वर्षांपर्यंत ऑनलाईन ग्राहकांची संख्या दहा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना बाजारात न जातासुद्धा ऑनलाईन खरेदीचा आनंद घेता येणार आहे. कॉम्पिटिशन अ‍ॅक्ट २००२ बरोबरच ग्राहक संरक्षण कायदा हे देखील ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.