पुणे : अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागेल. त्यामुळे रिक्त झालेल्या आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत येत आहेत. आता शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती विनायक मेटे यांनीही या स्पर्धेत उडी घेतली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळत असल्यास, त्यानुसार राजकीय भूमिका घेण्याची तयारी असल्याचे मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मेटे म्हणाल्या, ‘हा मुद्दा शासनाच्या अधिकारकक्षेत आहे. मात्र, आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करायला निश्चितच आवडेल. या पदावर काम करण्याची क्षमता आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. अर्धन्यायिक स्वरूपाचे कामकाजही पाहिले आहे.’

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार का, अशी विचारणा करण्यात आली असता मेटे म्हणाल्या, ‘पक्ष प्रवेशासंदर्भात लगेच निर्णय घेण्यात येणार नाही. आता राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे. समाजकारण करताना, काम करण्यासाठी राजकारणही करू. आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळत असल्यास अनुषंगिक भूमिका घ्याव्या लागल्या, तर त्या जरूर घेतल्या जातील.’

अशोक खरात प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणाबाबत मेटे म्हणाल्या,‘महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा घटना घडणेच अनुचित आहे. या प्रकरणात सुरू असलेले राजकारणही चुकीचे आहे. आतापर्यंत राज्य सरकारने केलेली कार्यवाही आशादायक आहे. मात्र, त्यापलीकडे अजून काही वेगळे पैलू सापडतात का, ते पडताळून अभ्यासणे गरजेचे आहे.’

बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मेटे म्हणाल्या,‘एखाद्या लोकनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पोटनिवडणुकीत संधी दिली जाते. भावनिक आधार म्हणून त्यांच्यामागे उभे राहण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. त्याच भूमिकेतून शिवसंग्राम संघटनेकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यात येत आहे.’‘सध्या अनेक गोष्टींचे राजकारण होताना दिसत आहे. मात्र, या पोटनिवडणुकीत राजकारण न करता सुनेत्रा पवार यांना सर्व स्तरावरून पाठिंबा मिळावा, अशी आमची भूमिका आहे. त्यांच्या प्रचारात सहभागी होणार आहे.’ असे मेटे यांनी स्पष्ट केले.