पुणे : फोडणीसाठी सढळ हाताने कढीपत्ता वापरणाऱ्या गृहिणींना हात आखडता घ्यावा लागणार आहे. एरवी बाजारात दहा रुपयांना मिळणाऱ्या कढीपत्त्याच्या एका जुडीचा दर २० ते २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
‘बाजारात सध्या कढीपत्त्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने आंध्र प्रदेशातून कढीपत्ता मागविण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातून सध्या पुणे, मुंबईतील बाजराात कढीपत्त्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात एक किलो कढीपत्त्याला १५० रुपये दर मिळाला आहे. कढीपत्त्याला घरगुती ग्राहकांसह हाॅटेल व्यावसायिकांकडून वर्षभर मागणी असते.
महाराष्ट्रात कढीपत्त्याची लागवड केली जाते. मात्र, लांबलेला पाऊस आणि हवामान बदलामुळे कढीपत्ता लागवडीवर परिमाण झाला. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांकडून कढीपत्ता मागविण्यात आला आहे,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कढीपत्ता व्यापारी सिद्धार्थ चव्हाण यांनी दिली.
‘मार्केट यार्डातील तरकारी विभागात सध्या आंध्र प्रदेशातून दररोज हजार ते दीड हजार किलो कढीपत्त्याची आवक होत आहे. थंडीमुळे आवक कमी होत आहे. उन्हाळ्यात ती वाढेल. एरवी बाजारात पाच ते दहा रुपयांना कढीपत्याची जुडी असते. वाहतूक खर्च, तसेच इतर खर्च विचारात घेतल्यास आंध्र प्रदेशातील कढीपत्ता तुलनेने महाग पडतो. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कढीपत्त्याचा दर तेजीत आहे,’ असे चव्हाण यांनी नमूद केले.
गेल्या तीन महिन्यांपासून कढीपत्त्याच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. घाऊक बाजारात कढीपत्त्याचा किलोचा दर २२ ते ४० रुपये होता. सध्या एक किलो कढीपत्त्याचा दर १५० रुपयांपर्यंत पाेहोचला आहे. बाजारात दररोज साधारणपणे एक ते दीड हजार किलो कढीपत्त्याची आवक होत आहे. उन्हाळ्यात महाराष्ट्रातील कढीपत्त्याची आवक नियमित सुरू होईल. – सिद्धार्थ चव्हाण, कढीपत्ता व्यापारी, तरकारी विभाग, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड.

