पुणे : दिवाळीतील चिवड्याचा स्वाद वाढविणाऱ्या कढीपत्त्याला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. एरवी, किरकोळ बाजारात दहा रुपयांना मिळणाऱ्या कढीपत्त्याच्या जुडीला २५ ते ३० रुपये मोजावे लागत आहेत. पुणे, मुंबईतील घाऊक बाजारात आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून कढीपत्त्याची आवक होत आहे.

‘कढीपत्त्याला वर्षभर मागणी असते. पुणे विभागातील सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात कढीपत्त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा पावसाने ओढ दिल्याने लागवडीवर परिणाम झाला. पुणे विभागातील कढीपत्त्याच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. कढीपत्त्याला असणारी एकूण मागणी विचारात घेता गेल्या काही महिन्यांपासून आंध्र प्रदेश, कर्नाटकातून कढीपत्त्याची आवक होत आहे. पुणे, मुंबईतील बाजारात चांगला दर मिळत असल्याने तेथील शेतकऱ्यांनी कढीपत्ता विक्रीस पाठविला आहे. दिवाळीत कढीपत्त्याचा वापर चिवडा तयार करण्यासाठी केला जातो. कढीपत्त्याला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

‘कढीपत्त्याला हाॅटेल व्यावसायिक, खानावळचालक, तसेच घरगुती ग्राहकांकडून वर्षभर मागणी असते. दाक्षिणात्य खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या हाॅटेलचालकांकडून कढीपत्त्याला मोठी मागणी असते. दिवाळीत चिवडा तयार करण्यासाठी गृहिणी, तसेच मिठाई विक्रेत्यांकडून कढीपत्त्याला मागणी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ३० ते ३५ रुपये किलो असा दर कढीपत्त्याला मिळाला होता. कढीपत्त्याला मागणी वाढल्यानंतर बुधवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात एक किलो कढीपत्त्याला ५० रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात एक किलो कढीपत्त्याला साधारणपणे ७० ते ८० रुपये किलो दर मिळाला आहे,’ असे सूर्यवंशी यांनी नमूद केले.

पालेभाज्यांच्या दरात वाढ

दुष्काळी परिस्थितीमुळे पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. पालेभाजीचा दर तेजीत आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला १५ ते २० रुपये, मेथी १० ते १५ रुपये, शेपू १५ ते २० रुपये, पालकला १५ ते २५ रुपये असा दर मिळाला आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्यांचा दर तेजीत आहे.

दिवाळीत चिवडा तयार करण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. नेहमीच्या तुलनेत कढीपत्त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून तयार फराळाचे पदार्थ खरेदीकडे गृहिणींचा कल वाढला आहे. मिठाईविक्रेते, फराळ तयार करणाऱ्या व्यावसायिकांकडून कढीपत्त्याला मागणी वाढली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे कढीपत्ता लागवडीत घट झाली असून, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील शेतकऱ्यांनी कढीपत्ता पुणे, मुंबईतील बाजारात विक्रीस पाठविला आहे. – राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाजी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड