पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज येथील विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी गुरुवारी फेटाळले.या प्रकरणात मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी विशाल अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड येरवडा कारागृहात असून, त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जाला विरोध करत आरोपींनी गुन्हा घडल्याच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रांसह पुराव्यामध्ये छेडछाड करण्याबरोबरच नवीन पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाला योग्य तो निर्णय देण्यासाठी कायद्यानुसार पुरावा लागतो. त्यामुळे न्याययंत्रणेशीच केलेला हा खेळ आहे. न्याययंत्रणेशी खेळणे हे अतिशय गंभीरतेने घेतले पाहिजे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केला होता.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींचा जामीन फेटाळला. अपघातातील मोटार परत मिळण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी येथील बाल न्याय मंडळात (जेजेबी) अर्ज केला असून या अर्जावर २८ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा >>>BJP Alliance in UP: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं काय चुकलं? मित्रपक्षानंच दाखवला आरसा! संजय निषाद म्हणाले…

‘पाहिजे आहे’ आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

अल्पवयीन मुलासोबत मोटारीत मद्याच्या अमलाखाली असलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपान सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. स्काय वेलवेडर सोसायटी, विमाननगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, अरुणकुमार देवनाथ सिंग (४७, रा. विमाननगर) याचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान सिंग याने या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर गुरुवारी युक्तिवाद झाला असला तरी अर्जावर अद्याप आदेश झालेला नाही.