पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले.पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी बडतर्फ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले. कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते.

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलासह मित्रांना येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तेव्हा एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा पाठविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, रक्तात मद्याचे अंश सापडू नयेत, या हेतूने रक्ततपासणीसाठी विलंब लावण्यात आल्याचाही आरोप झाला.

ससून रुग्णालयात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलासह त्याच्या मित्रांना रक्ततपासणीसाठी नेण्यात आले, तेव्हा बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाऐवजी त्याच्या आईने रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले होते. येरवडा पोलीस ठाण्यातील तत्कालीन निरीक्षक राहुल जगदाळे, सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी तपास योग्य पद्धतीने न केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांसह, अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील, आई, तसेच अन्य आरोपींना अटक करण्यात आली. जगदाळे, तोडकरी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीत आढळून आले, तसेच पोलीस शिपाई अमित शिंदे, आनंद भोसले यांचा संशयास्पद सहभाग आढळून आला.

जगदाळे आणि तोडकरी यांनी पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले, तसेच पोलीस शिपाई शिंदे, भोसले यांची पाच वर्षे वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले. अपघात घडल्यानतंर शिंदे, भोसले घटनास्थळी पोहोचले होते. ही माहिती त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली नव्हती. त्यामुळे रात्रपाळीत गस्तीवर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कल्याणीनगर अपघाताची माहिती मिळाली नव्हती.