भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंती कार्यक्रमास गालबोट लागू नये यासाठी कन्हैयाकुमार याच्या सभेस परवानगी देऊ नये, अशी मागणी करीत आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी या सभेस लोकहितासाठी हरकत घेतली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याची १४ एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार असल्याचे वृत्तपत्रांतून वाचनात आले. त्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी कन्हैयाकुमार याच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलीस उपायुक्तांकडे केली असल्याचे भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अरुण भालेराव आणि राष्ट्रीय समाज पक्ष अनुसूचित जाती व जमाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब हंगारगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कन्हैयाकुमार याची सभा घेण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, ही सभा आंबेडकर जयंतीच्या दिवशी घेण्यास आमचा विरोध आहे. १४ एप्रिल रोजी ही सभा घेतली गेली आणि अप्रिय घटना घडली तर, पुण्यातील शांततेला बाधा येईलच. पण, त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील. पुण्यामध्ये आजर्पयच अशा विषयावर कधीही मोठा संघर्ष झाला नाही. तो होऊ नये आणि जातीय रंग येऊ नये, अशीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलिसांकडे केली असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.