अभिनेत्री कंगना रणौतच्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्यामुळे चांगलाच मोठा वाद निर्माण झाला होता. १९४७ साली भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं होतं. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं अशा आशयाचं वक्तव्य तिनं केलं होतं. तिच्या या वक्तव्यावरुन राजकीय, सामाजिक वर्तुळात चांगलाच वादंग निर्माण झाला होता. तिच्या याच वक्तव्यावरुन काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी तिला टोला लगावला आहे.

देशातील बदलती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती या विषयावर पुण्यात वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कंगनाच्या या विधानाबद्दल आपल्याला काय वाटतं असा प्रश्न विचारला असता कन्हैय्या कुमार यांनी कंगनाला टोला लगावला. ते म्हणाले, “स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळतं, त्यागानंतर मिळतं, संघर्ष केल्यानंतर मिळतं. लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करुन स्वातंत्र्य मिळवलं आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही मिळत. म्हणून माझं एक आहे की मी अशा प्रकारच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. माझं माध्यमांना सांगणं आहे की तुम्हीही दुर्लक्ष करा”.

अशा प्रकारची विधानं ही मूळ मुद्द्यांकडून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी केली जातात, असं सांगत कन्हैय्या कुमार पुढे म्हणाले, “आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आजूबाजूला घडत आहेत, त्यावरुन आपलं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. ब्रिटीश डिव्हाईड अँड रुल करायचे. हे लोक आता डायवर्ट अँड रुल करत आहेत. कायमच हेडलाईन आपल्या हातात ठेवायची. असं काही बोलायचं, असं एखादं विधान करायचं की मूलभूत मुद्द्यांकडे लक्षच जाणार नाही. आता दोन दिवसांसाठी बँका बंद होणार आहेत. त्यावर चर्चा झाली पाहिजे. ही कोण कंगना? चित्रपट बनवते, तुम्ही बघता, टाळ्या वाजवता, संपवा विषय. स्वातंत्र्य भीक म्हणून नक्कीच मिळालेलं नाही, हे देशाच्या जनतेला माहित आहे. आणि आता तर मला वाटतंय की जास्तीत जास्त लोकांना आता या स्वातंत्र्याचं महत्त्व पटू लागलं आहे”.