पुणे: "कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर...",पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील बॅनर्स चर्चेत! | kasaba by election brahman community unhappy bjp candidate rasne banners viral | Loksatta

पुणे: “कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा?”, पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील बॅनर्स चर्चेत!

कसब्यातील भाजपाच्या उमेदवारीवर ब्राह्मण समाज नाराज? पुण्यात झळकलेल्या बॅनर्सची जोरदार चर्चा!

pune banner kasba by election
कसब्यातील भाजपाच्या उमेदवारीवर ब्राह्मण समाज नाराज? पुण्यातील बॅनर्सची जोरदार चर्चा!

राज्यात पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यात भाजपाला अपेक्षित यश आलं नसल्याचं दिसून आलं. यानंतर आता पुण्यातील कसबा आणि पिंपरी या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्याविरोधात स्थानिक ब्राह्मण समाजात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी जाहीरपणे यासंदर्भात वक्तव्य करून याचा किती फटका बसेल, ते येत्या २-३ तारखेला कळेल, असा गर्भित इशाराच दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या यावर सूचक भाष्य करणारे बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहेत.

पुण्यात लागलेले बॅनर्स नेमके कुणी लावले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून या बॅनर्सवर लिहिणाऱ्याचं नाव ‘कसब्यातील एक जाहरूक मतदार’ असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरी हे बॅनर्स आणि त्यावर मांडण्यात आलेला मुद्दा यामुळे पुण्यात पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे बॅनरवर?

या बॅनरवर पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड आणि आता कसबा या दोन मतदारसंघांमधील भाजपाच्या उमेदवारीचा उल्लेख केल्याचं सूचित होत आहे. “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापटांचा का???… समाज कुठवर सहन करणार?” असा प्रश्न या बॅनरवर उपस्थित करण्यात आला आहे.

पुण्यात झळकलेले बॅनर्स चर्चेत!

काय आहे राजकीय पार्श्वभूमी?

पुण्यात कोथरूडमध्ये स्थानिक उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत पाटील निवडून आले असले, तरी मेधा कुलकर्णींचं १ लाखांचं मताधिक्य पाटलांसाठी २० हजारांवर आल्याचं दिसून आलं. त्यापाठोपाठ आता कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी भाजपाकडून रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यावरून ब्राह्मण समाजात खदखद असल्याची भूमिका आनंद दवे यांनी मांडली आहे.

भाजपला ब्राह्मण उमेदवारांचे वावडे? ‘कोथरूड’ पाठोपाठ ‘कसब्या’तही डावलले

काय म्हणाले आनंद दवे?

“गेल्या वेळी मेधा कुलकर्णी कोथरूडमधून बाद झाल्या आहेत. आता टिळक बाद झालेत. त्यामुळे २१ आमदारांपैकी एकही आमदार असा नाही जो ब्राह्मण समाजाची बाजू घेतो. ब्राह्मण समाजावर जेव्हा आरोप होतात, त्याचं उत्तर ठापपणे देणारा प्रतिनिधी त्या भागात असला पाहिजे असं आमचं मत आहे. उद्या वेगळ्या समाजावर अन्याय झाला असता, तरी आमची हीच भूमिका असती. चिंचवडला न्याय लावला गेला, तोच न्याय टिळक घराण्याला लावला जायला हवा होता”, असं आनंद दवे म्हणाले आहेत.

“ब्राह्मण समाजात खदखद आहे. भाजपाचे लोक सोशल मीडियावरही जाहीरपणे लिहीत आहेत की हे कुठेतरी चुकतंय. त्याची नाराजी मतदारसंघात कशी दिसेल, याचं चित्र भाजपाच्या लोकांना २-३ तारखेला दिसेल”, असंही आनंद दवे यांनी नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 09:16 IST
Next Story
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकराना उमेदवारी जाहीर