आम आदमी पक्ष चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे. कसब्यात चार तर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी सहा जण इच्छुक आहेत. लवकरच इच्छुकांपैकी उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. भाजपाकडून एकाच कुटुंबातून इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आम्ही सहानुभूती न दाखवता ही निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे आपचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
आम आदमी पार्टीच्या आकुर्डी येथील कार्यालयात ‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे व शहराध्यक्ष अनुप शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये चिंचवड विधानसभा पोट निवडणुक संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
यावेळी बोलताना राठोड म्हणाले की, चिंचवड विधानसभेची पोट निवडणुक लढण्यासंदर्भात पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते आणि केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ यांच्याशी चर्चा झाली. आणि पोटनिवडणुक आम आदमी पार्टी लढण्याचे जाहीर करत आहे. आत्तापर्यंत बऱ्याच इच्छुकांनी तिकिटासाठी अर्ज दाखल केले आहेत. येत्या दोन दिवसात आपचा उमेदवार जाहीर करू असे हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले.
मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये पुरेसा शुद्ध पाणी पुरवठा, जन आरोग्य सुविधा, सुरक्षित रस्ते, सामाजिक सुरक्षा,प्र वासी वाहतूक,वीज वितरण इत्यादी अनेक नागरी समस्या आहेत. चिंचवड विधानसभा किंवा शहरातील इतर विधानसभा मतदार संघातील राजकारण गावकी भावकी नाती गोती यावर आधारित आहे. आम्ही राष्ट्रीय स्तरावर ग्लोबल व आधुनिक राजकीय संस्कृती निर्माण करत आहोत. पिंपरी चिंचवड शहराचे राजकारण, समाजकारण संविधानिक चौकटीत चालले पाहिजे. विविध भारती अशी ओळख असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रश्न हे स्मार्ट सिटीच्या रुपरेषेने सोडवले पाहिजेत असे हरिभाऊ राठोड यांनी नमूद केले.
शहराचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले की, जनतेच्या मूलभूत हक्कासाठी व भ्रष्टाचाराविरोधात लढलेली आमची पार्टी आहे, आमची जनतेशी युती आहे. आम्ही कोणाशी युती अथवा समझोता करणार नाही. या मतदार संघात दीड लाख आयटी मतदार आहेत, श्रमिक कामगारांचे आर्थिक शोषणाचे प्रश्न, शाळा, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक, सामाजिक सुरक्षितता असे प्रश्न आहेत. ‘आप’ला चिल्लर समजणाऱ्या विरोधकांना अवघ्या १० वर्षात आम आदमी पार्टी राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळवलेली एकमेव पार्टी असल्याचा इशारा बेंद्रे यांनी दिला.
कोणाच्या तरी रिमोट कंट्रोलवर शहराचे राजकारण चालते, इथे आम आदमी पक्षाचा जनतेकडे रिमोट कंट्रोल असणार आहे. असे चेतन बेंद्रे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. आम्ही भावनिक राजकारण करत नाही. सहनुभूतीचे राजकारण आम्हाला मान्य नाही. लोकशाहीत कोणताही मतदार संघ कुणाची जहागिरी नसतो. घराघरात आमचा नेता व आमचा पक्ष पोचलेला आहे त्यामुळे सामान्य जनतेचा आवाज त्याचे प्रश्न यासाठी आम्ही महाराष्ट्रात ही प्रथम निवडणूक लढवत असल्याचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.