scorecardresearch

..आता नंबर बापटांचा का? पुण्यातील फलकाची चर्चा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारत ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याचे तीव्र पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे.

pune bapat banner
कसबा मतदारसंघात भाजपने टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारल्याने फलक लागले आहेत. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारत ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याचे तीव्र पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. ‘कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला.. टिळक यांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापट यांचा का?.. समाज कुठवर सहन करणार? अशा आशयाचे सूचक भाष्य करणारे फलक कसबा विधानसभा मतदारसंघात लावण्यात आले आहेत.  या फलकाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या फलकाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, हिंदू महासंघानेही ब्राह्मण उमेदवार न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून  निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.   कसब्यातून टिळकांना उमेदवारी नाकारण्यात आली. सध्या ब्राह्मण समाजाचा एकही आमदार नाही. ब्राह्मण समाजावर आरोप होतात, तेव्हा त्याचे उत्तर देणारा प्रतिनिधी आवश्यक आहे, असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले. हिंदू महासंघ या संघटनेकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारही दिला जाणार आहे. तशी घोषणा आनंद दवे यांनी केली आहे.

टिळक कुटुंबीयांची नाराजी दूर

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या शैलेश आणि कुणाल टिळक यांची नाराजी दूर झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून टिळक यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केल्यानंतर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन टिळक कुटुंबीयांची ‘समजूत’ काढल्यानंतर प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय शैलेश यांनी घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, कोपरा सभांचे नेतृत्व करणार असल्याचे कुणाल टिळक यांनी सांगितले, तर कमी वेळात काम करून रासने यांना विजयी करण्याचा निर्धार शैलेश यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 01:02 IST