पुणे: ‘भाजपचा बालेकिल्ला’ अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये यंदा पक्षापेक्षा व्यक्तिगत पातळीवर निवडणूक लढविली जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर हे तीन ‘कर’ कोणती करामत करणार, यावर या प्रभागांतील निकाल अवलंबून असणार आहेत.

भाजपसाठी सोयीचा असलेल्या या मतदारसंघाची ओळख विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून बदलली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर रवींद्र धंगेकर हे निवडून आल्यावर ‘कसब्या’तही बदल घडू शकतो, हे स्पष्ट झाले. बीडकर आणि धंगेकर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, या वेळच्या महापालिका निवडणुकीत आंदेकर हेदेखील टक्कर देणार आहेत. बीडकर हे स्वत:, धंगेकर यांची पत्नी प्रतिभा आणि चिरंजीव प्रणव हे दोघे शिवसेना (शिंदे) पक्षाकडून, बंडू आंदेकर अपक्ष, त्याची स्नुषा सोनाली आणि भावजय, माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर हे तिघेही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने बीडकर, धंगेकर आणि आंदेकर या तीन नावांभोवती ‘कसब्या’तील प्रभागांमधील निवडणूक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत महापालिकेचा प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नाना पेठ, प्रभाग २४ कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल, प्रभाग क्रमंक २५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई आणि प्रभाग २६ घोरपडी पेठ-गुरुवार पेठ या प्रभागांचा समावेश होतो.

बीडकर, धंगेकर, आंदेकर समोरासमोर

कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल या प्रभागात भाजपचे गणेश बीडकर, शिवसेना (शिंदे) पक्षाचे रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव आणि अपक्ष सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर हे तिघे समोरासमोर आहेत. त्यामुळे हा प्रभाग तिघांचीही राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणारा ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत बीडकर आणि रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली होती. तेव्हा धंगेकर हे काँग्रेसपुरस्कृत अपक्ष उमेदवार होते. धंगेकर यांनी बीडकर यांचा पराभव केला होता. आता बीडकर यांच्यासमोर धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव आहेत. त्याचबरोबर आंदेकरचेही आव्हान असणार आहे. सध्या आंदेकर हा आयुष कोमकर खून प्रकरणात अटकेत असून, तुरुंगात आहे. तो तुरुंगातून निवडणूक लढवित आहे.

धंगेकर, आंदेकर कुटुंबातील महिलांमध्ये लढत

रविवार पेठ-नाना पेठ या प्रभागात ब जागा चुरशीची झाली आहे. या जागेवर शिवसेना (शिंदे) पक्षाकडून धंगेकर यांची पत्नी प्रतिभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’कडून दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली; तसेच भाजपने अनुराधा मंचे आणि शिवसेना (ठाकरे) गटाने निकिता मारटकर, आम आदमी पार्टीने विजया कद्रे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या गटात पंचरंगी लढत असणार आहे. सोनाली या तुरुंगातून निवडणूक लढवित आहेत.

याच प्रभागात क जागेसाठी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. त्या सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी नगरसेवक वीरेंद्र किराड यांची कन्या डाॅ. वैष्णवी किराड या शिवसेना (शिंदे) पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. भाजपने ऋतुजा गडाळे, काँग्रेसने नीलम करपे यांना उमेदवारी दिली. या ठिकाणी आंदेकर यांच्याविरोधात आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर या अपक्ष निवडणूक लढवित आहेत.

पल्लवी जावळे खुल्या प्रवर्गातून रिंगणात

तत्कालीन शिवसेनेच्या माजी नगरसेविका पल्लवी जावळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना खुल्या गटातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. अमोल देवळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अनिकेत कोठावळे आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रदीप अवचिते हे उमेदवार आहेत.

‘राष्ट्रवादी’त बंडखोरी

तत्कालीन शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासमोर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, शिवसेना (शिंदे) पक्षाचे गणेश नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांचे चिरंजीव शिवराज आणि मनसेकडून प्रल्हाद गवळी हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून, अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’कडून शरीफ खान हे उमेदवार आहेत.

माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य

या प्रभागात दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक, दिवंगत माजी आमदार प्रकाश ढेरे यांचे चिरंजीव विजय ढेरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

रुपाली पाटील-ठोंबरे दोन ठिकाणी उमेदवार

मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून दोन ठिकाणी उमेदवार आहेत. प्रभाग २५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई या ठिकाणी त्यांच्याविरोधात भाजपच्या स्वप्नाली पंडित आणि मनसेच्या अमृता भोकरे हे तीनच उमेदवार आहेत. प्रभाग २६ घोरपडे पेठ-गुरुवार पेठ या प्रभागात त्यांच्याविरोधात बंडखोरी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पायल चव्हाण या आहेत. तसेच भाजपच्या स्नेहा माळवदे, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या शीतल आंदेकर, काँग्रेसच्या भावना बोराटे या प्रमुख उमेदवार आहेत.

भाजप, शिवसेना ठाकरे पक्षाचेच उमेदवार

शनिवार पेठ महात्मा फुले मंडई या प्रभागाच्या ब जागेवर भाजपचे राघवेंद्र ऊर्फ बाप्पू मानकर आणि शिवसेना (ठाकरे) गटाचे समीर गायकवाड आणि दोन अपक्ष उमेदवार आहेत. अन्य पक्षांनी उमेदवार उभे केलेले नाहीत.


प्रभाग २३ – रविवार पेठ- नाना पेठ

अ : पल्लवी जावळे (भाजप), अनिकेत कोठावळे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रदीप अवचिते (शिवसेना), डाॅ. अमोल देवळेकर (काँग्रेस)
ब : अनुराधा मंचे (भाजप), सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रतिभा धंगेकर (शिवसेना), निकिता मारटकर (शिवसेना-ठाकरे)

क : ऋतुजा गडाळे (भाजप), लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), डॉ. वैष्णवी किराड (शिवसेना), नीलम करपे (काँग्रेस), कल्याणी कोमकर (अपक्ष)
ड : विशाल धनवडे (भाजप), शरीफ खान (राष्ट्रवादी काँग्रेस), शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), गणेश नलावडे (शिवसेना), संजय मोरे (शिवसेना-ठाकरे), प्रल्हाद गवळी (मनसे)


प्रभाग २४ – कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल

अ : कल्पना बहिरट (भाजप), पूनम काळोखे (राष्ट्रवादी काँग्रेस), वैशाली अफुवाले (शिवसेना), रंजना खडके (शिवसेना – ठाकरे)
ब : उज्ज्वला यादव (भाजप), सुजाता शेट्टी (राष्ट्रवादी काँग्रेस), मेघना तरवडे (शिवसेना), शिफा शेख (काँग्रेस)

क : देवेंद्र ऊर्फ छोटू वडके (भाजप), जयकुमार फुलावरे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत मते (शिवसेना), राजेश मोरे (शिवसेना – ठाकरे), नितीन परतानी (काँग्रेस)
ड : गणेश बीडकर (भाजप), गणेश नवथरे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रणव धंगेकर (शिवसेना), राहुल शर्मा (काँग्रेस), सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर (अपक्ष)


प्रभाग २५ – शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई

अ : स्वप्नाली पंडित (भाजप), रुपाली पाटील-ठोंबरे (राष्ट्रवादी काँग्रेस), अमृता भोकरे (मनसे)
ब : राघवेंद्र ऊर्फ बाप्पू मानकर (भाजप), समीर गायकवाड (शिवसेना-ठाकरे

क : स्वरदा बापट (भाजप), राधिका कुलकर्णी (राष्ट्रवादी काँग्रेस), शीतल पायगुडे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), अक्षता धुमाळ (शिवसेना), रिद्धिमा येवले (शिवसेना-ठाकरे)
ड : कुणाल टिळक (भाजप), सुनील खाटपे (राष्ट्रवादी काँग्रेस), अप्पा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार) सिद्धेश कामठे (शिवसेना), नीलेश हांडे (मनसे)


प्रभाग २६ घोरपडे पेठ- गुरुवार पेठ

अ : विष्णू हरिहर (भाजप), गणेश कल्याणकर (राष्ट्रवादी काँग्रेस), सिद्धेश्वर जाधव (शिवसेना), रवि पाटोळे (काँग्रेस)
ब : स्नेहा माळवदे (भाजप), रुपाली पाटील- ठोंबरे (राष्ट्रवादी काँग्रेस), पायल चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार), शीतल आंदेकर (शिवसेना), भावना बोराटे (काँग्रेस)

क : ऐश्वर्या थोरात (भाजप), सीमा काची (राष्ट्रवादी काँग्रेस), कमल व्यवहारे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), वंदना जेधे (शिवसेना), अमृता गायकवाड (शिवसेना-ठाकरे), संजीवनी बालगुडे (काँग्रेस)
ड : अजय खेडेकर (भाजप), विजय ढेरे (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण पोकळे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), साकिब महंमद हुसेन आबाजी (शिवसेना), सय्यद सईदबाब साहब (काँग्रेस), आशिष साबळे (मनसे).