कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भारतीय जनता पार्टी हा एक बुडबुडा आहे आणि तो फुटण्याची सुरूवात कसब्याच्या निकालाने झाली आहे अशी खोचक प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी सगळ्यांनीच प्रतिष्ठा पणाला लावली होती. बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना असतो तसे मुख्यमंत्रीही येऊन गेले मात्र काही उपयोग झाला नाही. कसब्यात भाजपाचा विजय होत होता कारण शिवसेना त्यांच्यासोबत होती असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय घडलं आहे कसब्यात?
कसबा या ठिकाणी असलेल्या भाजपाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने त्या ठिकाणी पोट निवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकीत टिळक यांच्या घरातल्या कुणालाही तिकिट न देता हेमंत रासने यांना तिकिट देण्यात आलं. त्यानंतर महाविकास आघाडीनेही या ठिकाणी उमेदवार दिला. सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपा विरूद्ध मविआ असा सामना कसबा मतदारसंघात रंगला होता. जो महाविकास आघाडीने जिंकला आहे.
कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आम्हाला उद्धव ठाकरेंनी आदेश दिले होते की काहीही करून रवींद्र धंगेकर विजयी झाले पाहिजेत त्यासाठीच आम्ही कामाला लागलो होतो. त्याचा परिणाम आज पाहण्यास मिळतो आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंना खाली खेचल्याचा हा परिणाम झाला आहे असंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.
रवींद्र धंगेकर हे ११ हजारांहून मतांचं मताधिक्य घेत कसबा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर विरूद्ध हेमंत रासने अशी ही लढत होती. या निवडणुकीत प्रचारासाठी आणि लोकांची मनं जिंकण्यासाठी सगळ्याच पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आले होते. या निवडणुकीचा निकाल लागला आहे. ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. यानंतर संजय राऊत यांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.