scorecardresearch

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार; व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची यादृच्छिक तपासणी

मतदान यंत्रांमधील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची शहानिशा होणार असल्याने निकालाला काहीसा विलंब होणार आहे. तरीदेखील दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.

Kasba Chinchwad by election
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. मात्र, मतदान यंत्रांद्वारे झालेले मतदान तपासण्यासाठी व्हीव्हीपॅटमधील (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) चिठ्ठ्यांची यादृच्छिक पद्धतीने (रॅण्डम) मोजणी केली जाणार आहे. मतदान यंत्रांमधील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची शहानिशा होणार असल्याने निकालाला काहीसा विलंब होणार आहे. तरीदेखील दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रुवारी) मतदान झाले. मतमोजणी गुरुवारी (२ मार्च) होत असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक सर्व पूर्वतयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीच्या वेळी तांत्रिक अडचणी येऊ नये, यासाठी चाचणी मतमोजणी होणार आहे. कसबा मतदारसंघांची मतमोजणी भारतीय खाद्य गोदाम, तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. चिंचवडमध्ये मतमोजणीच्या ३७, तर कसब्यात २० फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे चिंचवडपेक्षा कसब्याचा निकाल आधी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दोन्ही ठिकाणी प्रारंभी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर टेबलवरील मतमोजणीला सुरुवात होईल. कसब्याच्या मतमोजणीकरिता १६ टेबल अशी व्यवस्था केली असून मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत. एकूण १८० कर्मचारी नियुक्त केले असून २७० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची संख्या २५ आहे. चिंचवडच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ आणि टपाली मतपत्रिकांसाठी एक, असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत.

हेही वाचा – खडकवासला धरणातून शेतीसाठी आजपासून पाणी सोडण्यास सुरुवात

फेरीनिहाय आकडेवारी

प्रत्येक फेरीनंतर झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीची कसब्याची उद्घोषणा भारतीय खाद्य गोदाम, तर चिंचवडची शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणार आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या दुव्याद्वारे देखील उमेदवाराला फेरीनिहाय पडलेल्या मतांची आकडेवारी पाहता येणार आहे.

हेही वाचा – कसब्यात विजयासाठी ६५ हजारांचा जादुई आकडा

मतमोजणी आठ वाजता सुरू होणार

सकाळी सात वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली खोली उघडण्यात येणार असून, सर्व प्रक्रिया पूर्ण करून सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली आणि सरकारी सेवेनिमित्त मतदारसंघाच्या बाहेर कर्तव्यावर असलेले लष्करी, निमलष्करी, केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवानांसाठी असलेली इटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) ही मते मोजली जाणार आहेत. त्यानंतर मतदान यंत्रांमधील मते मोजली जाणार असून, त्यानंतर निकालाचा कल स्पष्ट होणार आहे. सर्वात शेवटी दोन्ही मतदारसंघातील प्रत्येकी पाच याप्रमाणे दहा मतदान केंद्रांतील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 11:25 IST