पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड चोरून पसार झालेल्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे चोरट्याला माग काढला.
संग्राम राजेंद्र जाधव (वय २९, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. श्री कसबा गणपती मंदिराचा मुख्य दरवाजा सोमवारी रात्री बंद करण्यात आला. मध्यरात्री दरवाजाची कडी उचकटून गाभाऱ्यातील दानपेटी फोडून रोकड चोरून नेण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. फरासखाना पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्याला पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमीत खुट्टे, प्रशांत पालांडे यांनी श्री कसबा गणपती मंदिर, जिजामाता बाग, गणेश रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात संशयित चोर दिसला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी जाधव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दानपेटी उचकटून रोकड चोरल्याची कबुली दिली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, राजेश महाला, उपनिरीक्षक राजेंद्र पाटाेळे, उपनिरीक्षक प्रणिल चौगले, हवालदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमीत खुट्टे, प्रशांत पालांडे, श्रीकांत वाघवले, विशाल शिंदे, विशाल ओैटी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव, चेतन होळकर यांनी ही कामगिरी केली.
