पुणे : लालचुटूक, आंबट-गोड चेरीचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा हिमाचल प्रदेशातील चेरीच्या लागवडीत घट झाली आहे. काश्मीरमधून मार्केट यार्डातील फळबाजारात चेरीची आवक होत असून, हंगामाच्या पहिल्या टप्प्यात चेरीचे दर तेजीत आहेत.

काश्मीरमधून फळबाजारात दररोज दीड हजार खोक्यांमधून चेरीची आवक होत आहे. दर वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशातील चेरीचा हंगाम सुरू होतो. यंदा हवामान बदलामुळे हिमाचल प्रदेशातील चेरीच्या लागवडीत घट झाली आहे.

पर्यटकांकडून मागणीत वाढ, तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे यंदा चेरीच्या दरात किलोमागे १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. गेल्या हंगामात एक किलो चेरीला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला होता. यंदा हंगामाच्या पहिल्या टप्प्यात चेरीचा किलोचा दर ४०० ते ४५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील चेरीचे व्यापारी सत्यजित सुयोग झेंडे यांनी दिली.

‘दर वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशातील चेरीचा हंगाम सुरू होतो. यंदा हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी अपेक्षेएवढी चेरी पुण्यातील बाजारात विक्रीस पाठविली नाही. हिमाचल प्रदेशातील हवामान बदलाचा परिणाम चेरीच्या लागवडीवर झाला आहे. हिमाचल प्रदेशानंतर काश्मीरमधील चेरीचा हंगाम सुरू होतो,’ असे त्यांनी नमूद केले.

चेरी दरवाढीमागची कारणे?

पुणे, मुंबईतील घाऊक फळ बाजारात चेरी विमानाने विक्रीस पाठविली जाते. यंदा हिमाचल प्रदेशातील चेरीच्या लागवडीत घट झाली आहे. पर्यटकांकडून मागणी वाढल्याने स्थानिक बाजारात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे तेथून पुणे-मुंबईतील बाजारात चेरी विक्रीस आली नाही. पुण्यातील फळ बाजारात विक्रीसाठी पाठविलेली चेरी सध्या काश्मीरमधून विमानाने येत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. त्यामुळे यंदा चेरीचा दर तुलनेने जास्त आहे, असे चेरी व्यापाऱ्यांनी सांगितले.

हवामान बदलामुळे चेरीच्या उत्पादनात घट झाली आहे. हिमाचल प्रदेशातील स्थानिक बाजारपेठेत दर चांगला मिळत आहे. त्यामुळे यंदा हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी चेरी विक्रीस पाठविली नाही. बाजारात काश्मीरमधील चेरीची आवक होत आहे. – सत्यजित सुयोग झेंडे, चेरी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड